एअर इंडियाचा मोठा निर्णय; अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स बंद, कोणते मार्ग प्रभावित होणार?

वाढत्या जेट इंधन दरांचा फटका आता विमान प्रवाशांनाही बसू लागला आहे. Air India ने जून २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या ऑपरेशनल खर्चामुळे अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील फ्लाइट सेवा तात्पुरत्या बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे परदेश प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनी फ्लाइट स्टेटस आधी तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहितीनुसार, एअर इंडियाने दिल्ली हबवरून चालणाऱ्या काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर थेट परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. शिकागो, नेवार्क, सिंगापूर आणि शांघाय या शहरांसाठी काही काळ फ्लाइट्स पूर्णपणे बंद राहणार आहेत. याशिवाय सॅन फ्रान्सिस्को, पॅरिस आणि टोरोंटो या मार्गांवरील उड्डाणांची संख्या कमी केली जाणार आहे. कंपनीने दररोजच्या सुमारे १०० आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात केल्याची माहिती समोर आली आहे.

या निर्णयामागे जेट इंधनाच्या किंमतींमध्ये झालेली मोठी वाढ हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. सध्या जागतिक स्तरावर जेट इंधनाची किंमत प्रति बॅरल १६२ डॉलरच्या पुढे गेली असून फेब्रुवारी महिन्यात ती सुमारे ९९ डॉलर होती. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा हिस्सा जवळपास ४० टक्के असल्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांना लांब मार्गाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे इंधनाचा वापर, क्रू खर्च आणि ऑपरेशनल वेळ वाढला आहे. काही उत्तर अमेरिकन मार्गांवरील विमानांना आता व्हिएन्ना किंवा स्टॉकहोम येथे तांत्रिक थांबे घ्यावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन यांनी वाढत्या इंधन खर्चामुळे काही आंतरराष्ट्रीय मार्ग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहिले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी उड्डाणांमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या इंधन दरांचा परिणाम आता थेट विमान सेवांवर दिसू लागला असून, प्रवाशांना महाग तिकीट, फ्लाइट्स रद्द होणे किंवा वेळापत्रकात बदल अशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.